*अन् जियो ग्रही पर्यटन*
११ फेब्रुवारी २०२५, सायंकाळी सात वाजता डिनर उर्फ रात्रीचं जेवण झाल्यावर म्हटलं एखादी चारोळी वा लेख लिहावा म्हणून विचारांच्या चक्रव्युहात प्रवेश करणार इतक्यात मिस कॉल थरथरला. मोबाईल वायब्रंटवर नव्हता तर छातीत हृदय ???? थरथरले. अन् त्याची थरथराट डावा हात अन् जबडा व डोक्यावर जाणवली. सौ. आणि सून दोघांनी लगबगीने तोंडांत साॅर्बिट्रेट नामक गुळ टाकला म्हणे प्रवास सुखरूप व निर्विघ्नपणे पार पडेल. व शिघ्रातीशिघ्र नैसर्गिक वायू रथावर स्वार होऊन उडाऩ स्थळावर पोहोचलो.
काय काय झालं ते काय केले पर्यंत चौकशी करत घरची वस्त्रे व दागिने काढून टाकली. व स्पेस सूट चढवला. सूट मधील भरपूर स्पेस मुळेच त्याला स्पेस सूट म्हणत असावे. डाव्या हातावर (Saline )हथफुल लावले तर उजव्या हाताला रक्तदाब मोजण्याचे बाजुबंद. बोटावर प्राणवायू दर्शविणारी अंगठी तसेच गळ्यापासून छातीपर्यंत विविध प्रकारच्या चैनी युक्त लाॅकेट सदृष्य सर्वात मोठा दागीना लावण्यात आला. तोपर्यंत *अन् जियो ग्रही पर्यटन* याचा व्हिसा रुपी रिपोर्ट सादर झाला.
आता अस्मादिक
'दर्द ए दिल' बरोबर घेऊन जाण्यासाठी निघाले. परिचारिका, परी न वाटता ताडीका जास्त वाटत होती. शरीर, मन आणि बुद्धी सर्व अंतरिक्षात तरंगायला लागली.
आयसीयु कक्ष नामक स्पेस शटल मध्ये एक दिवस मुक्काम करून पुढची वाटचाल होणार होती. माझ्या सारखेच अन्य १०/१२ पर्यटक येथे वास्तव्यास होते. प्रत्येक पर्यटकांच्या डोक्यावर माॅनिटर त्याचा आयुष्याचा ग्राफ शेअर बाजारातील वर खाली होणाऱ्या इंडेक्स सारखा असल्याचे उगाच मनात येऊन गेले.
परंतु पर्यटकांच्या चेहऱ्यावर त्यांचे सोयरसुतक दिसत नव्हतंच. काहींच्या नाकात नथ तर कमेरेत तागडी नुमा कमरबंद शोभत होता. कक्षा बाहेर एक राधा नामक दैवी शक्ती उभी होती. राधेच्या इच्छे शिवाय वृंदावन मध्ये कोणी शिरु शकत नाही असे ऐकले होते ते प्रत्यक्षात बघायला मिळत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळीच ब्युटीशियन उर्फ मेकअप आर्टिस्ट शरीर सजविण्यासाठी हजर. पॅडीक्युअर, मॅनीक्युअर असं बरंच काही त्याने पार पाडले. पहिल्यांदा हे सर्व करुन घेतांना विचित्रच वाटत होते. कालचा अंगावर चढविलेला स्पेस सूट काढून दुसरा चढवला गेला. आणि अस्मादिकांची स्वारी अन् जियो ग्रही जाण्यासाठी निघाली. मला अल्लादिनची जादुई सतरंजी वर झोपून तरंगत असल्याचा भास होत होता. 'दिला'ची धकधक वाढली होती.
तिथे निळी वस्त्रे परिधान केलेली मंडळी काही एलियन तर काही झोंबी सारखी माझ्या चारी बाजुला वावरत होती. भल्या मोठ्या यंत्राखाली झोपवून एकाने उजव्या हाताच्या मनगटावर एक इंजेक्शन दिले. नंतर मात्र दिड ते दोन तासात काय झालं, कसे झाले काहींच आता आठवत नाही. मी मात्र फक्त देवाचा धावा सुरू केला होता.
अचानक एका झोंबीने कार्य सफल व संपूर्ण झाल्याची घोषणा केली.
डॉ नुमा आलेल्या केशवाने अत्यंत शितल असे कार्य पुर्ण करुन हृदयाच्या धमन्या मधून निर्माण झालेले अवरोध हटविले होते. आणि विर सैनिक छातीवर मिळालेली पदकं मिरवतात त्यापेक्षा अधिक अभिमान छातीत बसवलेल्या स्टेंटरुपी पदकांचा बाळगून परत आयसीयु नामक स्पेस स्टेशन परतलो. ४८ तास निरीक्षणाखाली राहून परतीचा प्रवास करत. अन् जियो ग्रहावरुन सुखरूप घरी आलो. आणि सर्वांना गर्वाने सांगतं सुटलो.
लढून आलो,
लढून जिंकलो,
धमन्यांचे रस्ते
मोकळे करून आलो।
स्टेंटचं मेडल
लावून छातीत,
घराच्या चार भिंतीत
सुखरूप परतलो
🕉️💥
No comments:
Post a Comment
Thanks for the comments