*ग गोविंदनगर चा*
नाशिक शहरातील एक उपनगर गोविंदनगर, मध्यम वर्गीय वस्ती असलेलं शांत परिसर म्हणून प्रसिद्ध. एन एच ३, नंदिनी ( नासर्डी) नदी व इंदिरा नगर बोगदाल ते सिटी सेंटर कडे जाणारा रस्ता ( जिजाऊ मार्ग) ह्या त्रिकोणी आकारामध्ये प्रामुख्याने समावेश असलेला परिसर म्हणजे गोविंद नगर. नावाप्रमाणेच गुण्यागोविंदाने राहतो येथील जणमाणस.
जिजाऊ मार्गापलिकडे विकसित सदाशिव नगर, सद्गुरू कर्मयोगी जवळपास सारखेच. आजकाल ह्या परिसराला न्यु गोविंद नगर म्हणून बिल्डर लॉबी घरांना चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून म्हणतात. असो.
गोविंद नगर व न्यु गोविंद नगर मध्ये एक सुक्ष्म फरक जाणवतो. गोविंद नगर मधील रहिवासी थोडा वैश्य प्रवृत्ती धारक तर पलिकडील खान्देशी जीभाऊ प्रकारात मोडतो. एखाद दुसरा अपवाद वगळता येईल. त्याला कारणीभूत ठरतं ते गोविंद नगर मध्ये बरीच दुकानं आणि दवाखाने थाटली आहेत तर पलिकडे अपवादात्मक एक दोन असतील. त्यामुळे गोविंद नगर मधील रहिवासी स्वतः ला उजवा समजून घेतो.
गोविंद नगर दवाखान्यांच आगर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दवाखान्यात असलेल्या पेशंटची संख्या किंबहुना येथील रहिवासी इतकी असावी.
२५ तीस तर दंत चिकित्सक असावे. सकाळी सकाळी हास्य कट्ट्यावर जाऊन जितके लोकं दात काढतात त्या पेक्षा अधिक दंत चिकित्सक दररोज दातांशी खेळत असतात. हाडं जोडण्यापासून मनं जोडणारी तसेच डोळ्यातील मोती आणि हृदयातील ब्लाकेज काढणारी डॉ मंडळी येथे आहे. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी नाशिक शहरातील बरीच मंडळी गोविंद नगरला भेट देतात.
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गोविंद नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या कदाचित मुलांपेक्षा अधिक असावी नाही मुळी आहेच. म्हणूनच सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत दुसरी इनिंग खेळत असलेले ज्येष्ठ बघायला मिळतात. योग, हास्य कट्टा, माॅर्निंग वाॅक व देवदर्शन यांत तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने संचारत दिसतात. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोविंद नगर ज्येष्ठ नागरिक संघ व त्यांचे विविध उपक्रम. व्याख्यान माला, सहली, प्रवचन, भजन संध्या, योग, हास्य योग, खेळ स्पर्धा इत्यादी गोष्टींचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.
गोविंद नगरचं महत्वाचे प्रसिद्ध ठिकाण आहे गणपती मंदिर. सकाळ संध्याकाळ ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा कट्टा म्हणून उपयोगी. संकष्टी चतुर्थीला पुर्ण गोविंद नगर व इतर परिसरातील भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून गर्दी करतो. संध्याकाळी ज्येष्ठ महिला आपल्या भजन हरी पाठ आरतीने बाप्पाला साद घालत असतात.
नाशिक शहरातील एकमेव असं हिंगळाज मातेचं मंदिर व भावसार समाज भवन गोविंद नगरची शान वाढावी असं आहे. वातानुकूलित भवनात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.
निर्मला देवी ध्यान केंद्र, योगा केंद्र तसेच विविध खेळांसाठी चौक नं ४ जवळ विकसित मैदान याचा लाभ येथील नागरिक व तरुण घेतात.
शांती उद्यानात ब्रम्हाकुमारी यांचं ध्यान केंद्र, परिसरातील नागरिकांचं आध्यात्मिक ज्ञान कण मिळवण्याचं स्थान.
न्यु इरा ही एकमेव शाळा. सकाळ संध्याकाळ चिमुकल्या पावलांची आणि त्यांची डिलीव्हरी करणाऱ्या वाहनांची गर्दी बघायला मिळते.
तर असं हे
सत्यम स्विट व सागर स्विट मध्ये वसलेले हे स्विट नगर म्हणजे गोड *गोविंद नगर.*
©ॐप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments