अव्यक्त प्रित
प्रित माझी अव्यक्त राहीली
हृदयाच्या स्पंदनात लपून
भावना अंतरीच्या हरवल्या
मौन मौन शब्दात रुसून
प्रित जागली मनात अजाणता
हृदयाचा ठाव पोहचवु कसे
प्रथम दर्शनी पाहून वेडावले
मन हे नियंत्रणात ठेवु कसे
झोपेच्या झोक्यावर हरवते
भुरळ तुझ्या कुरळ्या केसांची
प्रेम पत्रात अपूर्ण अनुदिनी
दडून सुंदर ओळी वाक्यांची
तिरकस नयन कटाक्षाने
घायाल होत अंतःकरणी
उघडुन मनाची तिजोरी
कशी करावी मनधरणी
प्रितीचे नजरेतील गुपीत
नजरेत गुप्त होवून लपले
तुझ्या डोळ्यांत दाटलेले
प्रेम माझे अव्यक्त राहिले
No comments:
Post a Comment
Thanks for the comments