मास्क

 *मास्क*


राजेश खन्ना यांच्या दाग नावाचा एक सिनेमा १९७० च्या जवळ पास आला होता यातलं एक गाणं होतं ' जब भी जी चाहें, नई दुनिया बसा लेते है लोग चेहरे पे चेहरा लगा लेते है लोग...आठवण ह्या साठी की आपण सर्व जण ह्या कोरोना काळात तोंडावर मास्क लावून म्हणजे चेहऱ्यावर मास्क लावून आहोत. मास्क म्हणजे तरी काय तर आपला चेहरा लपवून कापडी वा तत्सम दुसरा चेहरा लावायचा. आज मात्र स्वतःच्या मर्जीने वा इच्छेने नाही तर शासनाच्या आदेशानुसार व ₹५००/- चार दंड ठोठावला जावू नये म्हणून मास्क चढवून फिरत आहोत. माझ्या सारखे काही कोरोनाने पकडून १४/१५ दिवस कोठडीत (क्वारंटाईनची) रवानगी करण्यात येऊ नये म्हणून मास्क वापरत असतो. पुर्वी चोर/डाकु वा आतंकवादी असा मास्क पोलिसांनी पकडून कोठडीत डांबले जावू नये म्हणून लावत असे. अर्थात मास्क कोठडी वाचविण्यासाठी उपयोगी पडू शकतो. मास्कचा उपयोग लपण्यासाठी होतो तो (masque ) मास्क वेगळा, आपल्या ह्या मास्कचा उपयोग चेहरा लपवण्यासाठी वा चेहऱ्याची काळजी, सुरक्षा योजनेचा एक भाग म्हणून आहे. प्रेमाच्या / लग्नाच्या विश्वात लज्जा, आदर असे गुणदर्शक म्हणून मास्क हा घुंघट, परदा, हिजाब वा बुरखा सारख्या विविध रुपात आढळतो.


मास्क हा तसा ३० ते ४० हजार वर्षांपासून चलनात असल्याचे पुरातत्व विभाग सांगत असते. त्या वेळी बहुतेक मास्क हा मनोरंजनाचा भाग म्हणून वापरलं जाण्याचं साधन होतं. 

कथकली हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. 


आदिवासी उर्फ वनवासी जातींमध्ये मास्क लावून देवाच्या मध्यस्थी करून भुतं, चुडेल वा तत्सम पापी शक्तींचा नायनाट करण्यासाठी किंवा जास्त शक्ती असलेलं भुत दूर पळवण्यासाठी उपयोग होताना आपण प्रत्यक्षपणे जरी नाही तरी सिनेमात बघितले आहेत.  कदाचित म्हणूनच करोनाचं भुतं दूर करण्यासाठी वा नायनाट करण्यासाठी मास्कचा उपयोग सुरू झाला असावा. अनिस ने शोध सुरू करायला हरकत नाही.


जैन संप्रदायात विशेष करून श्वेतांबर संप्रदायातील मुनी आपल्या श्वासाने जीवजंतूला त्रास होऊ नये म्हणून मास्कचा उपयोग करतात. आपण मात्र जीवजंतूनी आपणास त्रास देऊ नये म्हणून वापर करतो.


आज पुर्ण जग मास्कमय झालेले आहे. मास्क न लावता बाहेर पडले तर कोरोना तुम्हाला गाठेलच असं नाही पण तुमचा खिसा ५००/१००० ने हल्का व पोलिस दंडुक्याचा प्रसाद मिळू शकतो. त्या वेळी आपल्या मनाला १० ते १०० रुपयांपर्यंत मिळणाऱ्या मास्क ची किंमत कळते.


मास्कची खरी शक्ती ही 1994 मध्ये प्रदर्शित मास्क नावाचा इंग्रजी भाषेत आलेल्या चित्रपटात दर्शविलेली आहे. स्टॅन्ली हा बॅंक कर्मचारी पण मास्क चेहऱ्यावर चढवताच सुपर हिरो बनतो व अफाट शक्तीने कसा मुकाबला करतो. म्हणूनच कदाचित कोरोना सारख्या वैश्विक राक्षसाला हरवण्यासाठी मास्कला मैदानावर म्हणजे चेहऱ्यावर चढवताच प्राप्त मास्कशक्तीने नामोहरम करण्यासाठी ठरवलं असावं.


करोना पासून बचाव करण्यासाठी आलेल्या ह्या मास्कने सर्वात जास्त त्रास होत असेल तर तो कानाला. लहानपणी गुरुजी कान पकडून चूक दाखवत असे. निसर्ग वा सृष्टीशी केलेल्या प्रतारणेची शिक्षा म्हणूनच कदाचित आपल्या सर्वांचे कान हा मास्क पकडत असेल.

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...