आपल्या येथे १८ पुराणं व १८ उपनिषदे आहेत पण जर का १९ वे पुराण लिहिले जाईल तर ते चहा व त्याचा गुण गौरव दाखल लिहण्यात येईल. कलीयुगातील अमृत पेय म्हणजे चहा. समुद्र मंथनातून निघालेल्या अमृता साठी देव दानव यांच्यातील संघर्ष म्हणजे हिसकाहिसकीतुन काही थेंब जेथे पडले तेथे उगवलेल्या वनस्पती ही अर्थात चहा.
चहा पुराण प्रारंभी 'वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा'
हा गणपती बाप्पा एवढाच चपखलपणे
चहाला लागू होऊ शकतो.
चहाची किटली बघुन लक्षात येते की वक्रतुंड महाकाय किती अचूक आहे. आणि सर्व कार्य
चहा शिवाय निर्विघ्नपणे पार पडली असं होऊ शकतं का? अगदी अधिवेशना आधी
चहा पार्टी झाल्याशिवाय सफल होतच नाही. मिटिंगमध्ये, वाटाघाटीत, पर्यटनात
चहा हवाच. लग्नात सुद्धा
चहा दिवसभर वर्हाडी मंडळींसाठी सुरू असतो. सप्तपदी अग्नी व पुरोहित यांच्या साक्षीने होत असला तरी पात्र पसंदी मात्र
चहाच्या साक्षीने होत असते.
चहा, चा, चाय, असे तर युरोपात टी असं म्हटलं जातं असलं तरी आपल्या भारतात विष्णु, शिव ह्यांच्या प्रमाणे सहस्त्र नावे निश्र्चितच आहेत व चहा पुराण मध्ये चहा सहस्त्रनाम असेल. काही उदाहरणे ह्या प्रमाणे, जुगनु, पिवर, पंजाबी, मारामारी, कटींग, अर्धी. कुठल्या द्रव पदार्थाची कटींग होत असेल तर तो चहा नावाचा द्रव. काही ठिकाणी तर चहाला नंबर आहे, एक नंबर, दोन नंबर, तिन नंबर. आणि विशेष म्हणजे ३ नंबर हा तिसऱ्या दर्जाचा नसुन पहिल्या दर्जेदार असतो. कडक, मिठी असाही प्रकार आहे. आजकाल अमृततुल्य चहाचा बोलबाला आहे.
दारुचे व्यसन नसलं तरी घोटभर घेणाऱ्याला लोकं दारुडा, दारुड्या म्हणायला सुरु करतात पण दिवसातून २०/२० कप रिचवणाऱ्याला कोणी चहाडा किंवा चहाड्या म्हणत नाही.
व्हाटस् अप युनिव्हर्सिटी साहित्यिकाने चहा ची व आयुष्य याची खालिल प्रमाणे सांगड घातली आहे.
आयुष्य चहा तयार करण्यासारखे आहे. गर्वाला उकळु द्यावे समस्यांना वाफ होउन उडुन जाउ द्या, सुखाची साखर विरघळुन जाउ द्या, दुःखाचं आलं व मैत्री ची इलायची मिसळु द्या दोष गाळुन घ्या आणि प्रसन्नता, आनंदाचे घोट हसत हसत घ्या.
चहाचे प्रकार किती. लिंबू चहा, ग्रीन टी ,ब्लॅक टी, व्हाईट टी, हर्बल टी, ऑलंग टी, फर्मेंटेशन टी, उकाडा, गुलाबी चहा इ. चहाचे तसे बरेच ब्रॅंड आहेत, पण वाघबकरी तसं समर्पक. त्यात चहाची महती इंगीत आहे की वाघ आणि बकरी एकाच बशीत चहा पिऊन तृप्त होतात. चहाची जितकी महती तितकीच चहा पाजुन आपल्या ध्येय साध्य करण्याऱ्यांची. ७ लोक मार्ग गाठता येतो चहा विकुन हे मोदीजी नी दाखवून दिले आहे. २०१४ साली कांग्रेसच्या पराभवात चहाचे योगदान होते असं म्हणतात पण मी म्हणेल चहाची व चहा विकणाऱ्याची हेटाळणी भोवली. ममता बॅनर्जी यांनी सुध्दा मागील निवडणुकीत लोकांना चहा प्यायला दिले व आपला विजय पक्का केला. राहुल गांधींही वायनाडला गेले कारण वायनाड हे चहा पिकवणारा एक भाग आहे. गोंदिया येथील एक चहा विकणारा दररोज सव्वा लाख रुपयांची चहा बनवून विकतो हे रेड पडल्या वर समजलें.
चहा! असं चहाचं नुसतं नाव जरी काढलं तरी मानसिकरीत्याच मरगळलेला माणूस ताजातवाना होतो. कट्टर चहाप्रेमींना रात्री झोपेतून उठवून विचारले ,”चहा घेणार का?” तरी नाही म्हणणार नाहीत कारण चहाप्रेमींच्या मते चहाला नाही म्हणणे हे मोठे पाप आहे! पृथ्वीवरचे अमृत म्हणजे अमृततुल्य चहा असे सर्व चहाप्रेमींचे मत असते.
जो चहा पिताच मेंदू खडबडून जागा होतो, ब्रह्मानंदी टाळी लागते असा चहा करण्याची कला फक्त काहीच लोकांच्या हातात असते. चहा म्हणजे माणसांना एकमेकांशी जोडून ठेवणारी संस्कृती आहे.
चहा हे पेय नसून ती एक संस्कार असतो आणि चहा करणे हे एक कृती नसून तो एक समारंभ असतो. उत्तम चवदार चहा करणे हे येऱ्यागबाळ्याचे कार्य नाही.
तर असा हा चहा पुराणाचा सुरुवातीचा भाग...
No comments:
Post a Comment
Thanks for the comments