Friday, December 2, 2022

बटाटा

 *बटाटा*


गेल्या ऑगस्ट महिन्यात म्हणजे १९ ऑगस्टला बटाटा दिवस होता. नावात टाटा असलं तरी अजून टाटा कंपनीचा ब्रॅण्डेड बटाटा बाजारात दाखल झालेला ऐकिवात नाही. 

हिंदीत बटाटा आलु होतो, लालुप्रसाद यादव यांच्या कार्यकर्त्यांनी लालु व आलु दोघे किती महत्त्वाचे आहे ते घोषणेत सांगत होते की जब तक समोसे रहेगा आलु, तब तक बिहार में रहेगा आलु. लालूंच काय झाले ते आपणास माहीत आहे पण आलु मात्र अजूनही समोसा मध्ये ठाण मारुन बसलेला आहे. 


बटाटा हा तसं कंद ह्या प्रकारात मोडतो. पण आता बटाटा आपल्या किचनमध्ये महत्वाची वस्तू म्हणून ठाण मांडून बसला आहे. 


बटाटा मुळचा अमेरिकन म्हणजे स्मार्ट देशातला. पण आपल्या कडे डोक्यात बटाटे भरले आहेत का म्हणून स्मार्ट नसलेल्या व्यक्तीला हिणवतात. अमेरिकेने बटाट्याला आपल्या कडे पाठवलं आणि बटाटे ज्यांच्या डोक्यात भरलेले नाही अशा लोकांना अमेरिकेत बोलवलं. 

पेरू ह्या देशात बटाट्याला "पापा" म्हणतात. कदाचित सर्वं भाज्यांचा पापा म्हणजे बाप म्हणून असावे. तेथे हा पापा रंगीन आहे म्हणजे विविध रंगात आढळून येतो. 


बटाट्याला डोळे असतात पण डोळे बंद करून तो सर्व भाज्यांबरोबर सूत जमवतो. बटाटा आवडत नाही अशी व्यक्ती मिळणं कठीण वा दुरापास्त.  


बटाटा हा तसा पुरुषी मनोवृत्ती पण ह्याचा जाती मात्र स्त्री वर्गातल्या चंद्रमुखी, ज्योती, सिंदुरी. बटाटा हा दोन प्रकारचा एक भाजीचा व दुसरा तळून करणाऱ्या पदार्थांचा म्हणजे चिप्स साठीचा. 


बटाटा तसा तळेगावचा प्रसिद्ध. पण बटाट्याला प्रसिद्धी देण्यात समोस्या बरोबरच एका मोठ्या नेत्याचा हात नाही तर त्याचे बोल होते. बटाट्या पासून सोने बनवणारी मशिन काढण्याचं विधान बटाटा भरलेल्या लोकांना कदाचित कळलं नसावं. ते समजलं फक्त चिप्स तयार करणाऱ्यांना. दहा रुपये प्रति किलो बटाट्याला १००० रुपयां पेक्षा जास्त किंमतीने हवा भरलेल्या पुडक्यात भरून बटाट्याचं सोनं करण्याची किमया त्यांनी करून दाखविली.


नुकतेच टांझानियात एक समोसा दोन हजार रुपयांत विकला जातो असं वाचण्यात आले. म्हणजे बटाट्याचे सोनं झालचं की वा बटाट्याला सोन्याचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही.


कांदा आणि बटाटा यांचं सख्य फार. दोन्ही एकाचवेळी एकाच दुकानात आढळतात. विशेष म्हणजे घेणारा दोघांना बरोबरीने भेदभाव न करता घेऊन जातो. 


आपण मात्र अमेरिकेतून आलेल्या बटाट्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला आहे. अगदी अगरबत्ती स्टॅण्ड म्हणून. बटाटा आपला खांद्यावर एखादा झेंडा मिरवावा तसा अगरबत्ती पाठीवर घेऊन बसतो. 


गोऱ्यापान गालावर पडलेली काळी निशानी काढायला बटाटा हवा. तर भाजीत मीठ जास्त प्रमाणात पडले तर एनडीआरएफ टिम सारखा बटाटा भाजीत उडी घेतो. व बायकोचे दोष आपलेच म्हणून ओढवून घेतो तसा खारटपणा शोषून घेतो. 


मुंबई मध्ये बेसन पीठाचे कोट पांघरुन पावात बसतो तर गुजरात मध्ये चटपटीत पुरण बनून दाबेलीत दाबला जातो.

कच्छ सौराष्ट्र मध्ये घुघरा तर ओरीसा मध्ये शिंगाड्यात लपतो. 

उपवासांच्या पदार्थात तर पदाधिकाऱ्या प्रमाणे अग्रेसर असतो. मग साबुदाणा खिचडी असो वा उपवासाचा शिरा बटाटा महत्त्वाचा घटक असतो. चिप्स, फ्रेंच फ्राईड, इ बटाट्याचीच रुपे आहेत. 

चायनाला अमेरिकेचं वावडे आहे म्हणूनच चायनीज नुडल्स मध्ये अमेरिकन बटाट्याला प्रवेश मिळाला नाही. फ्रेंच फ्राईज तर मला कपिल शर्मा शो मध्ये स्रि वस्त्र परिधान करून सुंदर मनमोहक मनोरंजन करणाऱ्या पात्रांसारख्या वाटतात. म्हणजे मुळ पुरुष असलेला बटाटा कमनीय व सेक्सी चव घेऊन आपल्या समोर सादर केला जातो. 


असो तर असा हा बटा(नसलेला)टा ...बटाटा.

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...