*पाऊस*
पांडव लेणीच्या डोंगरावरून
ढगांच्या पालखीतून आला
मेघांच्या नगारा बडवित तो
पावसाच्या धारा सांडत आला
हिरव्यागार पाचुच्या शेला
पर्वतीला पांघरवून गेला
थेंब कळ्या मनांत उमलवून
रिमझिम बरसला पावसाळा
अमृत वर्षावाने पुलकित
झाली अवघी वनराई
प्रसन्न जाहल्या लता वेली
गुलाब मोगरा अन् जाई
धुंद होऊन पवन वाजवी
गंधर्वाची सुमधुर सनई
दवबिंदूच्या पावन स्पर्शाने
प्रफुल्लित झाली हिरवाई
अवखळ अल्लड निरझर
डोंगराच्या गालावरून वाहती
निघाले पाण्याचे निर्मल झरे
अवनीला गुदगुल्या करती
©ॐप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments