*दाढी*
सध्या दाढी ठेवणं किंवा वाढवणं फॅशन नसून आवश्यक झाले आहे. पंतप्रधानां पासून ते अगदी फिल्म हिरो पर्यंत. दाढी असेल तर यशच यश. अन्यथा अपयश.
नुकतचं महाराष्ट्र राज्यातील सत्ता नाट्य आपण बघितले. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून ऐनवेळी पत्ता कापला गेला आणि चक्क शशदाढी युक्त एकनाथ शिंदे *झुकेगा नही* म्हणत मुख्यमंत्री झाले. अशी आहे दाढीची शक्ती वा जादू. असेल दाढी तर मिळेल सत्तेची गढी.
एक नूर आदमी दस नूर कपडा ऐवजी आता एक नूर आदमी दस नूर दाढी अशी म्हण करायला हरकत नाही.
दाढी वाढते झरझर सत्ता येते भरभर ह्या म्हणी प्रमाणे मोदींना भरभर सत्ता मिळत गेली. मला तर वाटतं मोदींच्या अविरत सफलतेचे गुढ त्यांच्या दाढी मध्ये लपलेले आहे. तसेच राहुल गांधींचं अपयश दाढी नसल्याने पिच्छा सोडत नाही. हे कुणीतरी राहुल प्रेमीने राहुल गांधी पर्यंत हा सफलतेचा मंत्र पोहोचता करायला हवा. राजा बोले दाढी हाले ऐवजी दाढी वाला बोले प्रजा हाले अशी म्हण प्रचलित करायला हरकत नसावी.
उ ठा अर्थात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांसारखी दाढी ठेवली असती तर त्यांना असं उठावं लागलं नसतं.
दाढी ठेवण्याचे अनेक प्रकार नव्हे तर स्टाईल आहेत. लांब दाढी, फ्रेंच, बुल्गानीन, छोट्या छोट्या केसांची तर काही जण नुसतं खुंट वाढलेली ठेवतात. Youtube वर १०० पेक्षा अधिक प्रकारच्या स्टाइलची माहिती उपलब्ध आहे.
७० च्या दशकात गुळगुळीत दाढी करणाऱ्या चाॅकलेटी हिरोंचा काळ होता पण आता अल्लु अर्जुन सारखी वा कोहली सारखी दाढी वाल्यांचं युग आहे. त्याकाळी दाढी म्हणजे आळसावलेल्या व्यक्तींच प्रतिक मानलं जात असे वा गुंडगिरीचं.
असो ज्यांना ज्यांना यशाची शिखरे पादाक्रांत करायची असेल तर दाढीची गुरुकिल्ली मुखचंद्रावर ठेवायला हवी.
©ॐप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments